RSS

Tag Archives: Marathi language

जागतिक पुस्तक दिन अर्थात World Book Day

Image आज जागतिक पुस्तक दिन. खरंतर मला कधी कधी कळत नाही आपल्याला खरंच पुस्तकांसाठी अश्या एखाद्या दिवसाची गरज आहे का? म्हणजे मला मान्य आहे की अश्या दिवसांचा उपयोग होतो तो म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तकं पोहोचवण्यास, पण त्याच बरोबर हेही आहे की याद्वारे आपण पुस्तकांना एका विशिष्ट दिवसात बंद करून ठेवतो. म्हणजे एक दिवस पुस्तकांबद्दल भरभरून बोलायचं, क्रॉसवर्ड सारख्या शॉप्स मधे चक्कर टाकायची, ३-४ आकर्षक दिसणारी पुस्तकं विकत घ्यायची, आणि मग वर्षभर ती पुस्तकं लिविंग रूम मधे बुकशेल्फ वर सजवून ठेवायची.

खरंतर प्रत्येक व्यक्ती असंच वागते असं मला म्हणायचं नाही. पण हे सत्य आहे की आपल्यातले बरेच जण पुस्तक दिन या दिवशी याहून अधिक काही करत नाही. (काही महाभाग हे ही म्हणायला कमी करत नाहीत की एवढं तरी करतायत ना, समाधान माना.)

खरंतर आज पुस्तकं आणि त्यातूनही मराठी पुस्तकांसाठी करण्यासारखं खूप काही आहे. (आपण चर्चा करायचं सोडून बाकी काही करत नाही ते सोडा) सध्या सगळ्यात जास्त गंभीर प्रश्न लोकांना वाटतो तो हा की नवीन पिढी पुस्तकांपासून दूर जातेय, मराठी पुस्तकांना नवीन पिढी हात लावत नाही वगैरे वगैरे. मी स्वतः २२ वर्षांचा आहे. म्हणजेच नवीन पिढी चा प्रतिनिधी म्हणून मी यावर बोलायचं धाडस करू शकतो. मी स्वतः पुस्तकं वेडा आहे. हे खरंय की मी माझ्या पिढीत अल्पमतात आहे. पण तरीही मी असं ठाम पणे म्हणू शकतो की चांगल्या मराठी पुस्तकांना आजही मागणी तेवढीच असते. माझे कित्येक मित्र मैत्रिणी हे पुलंचे fan आहेत. व.पुं.ची पुस्तकं आणि कथाकथनाच्या CDs अजूनही खपतात. मी आणि माझी एक मैत्रीण प्रकाश नारायण संतांच्या लंपन वर तासंतास गप्पा मारू शकतो. अजून एक मित्र आहे ज्याला सावरकरांचे जवळ जवळ सर्व साहित्य पाठ आहे. मला तरी माझ्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात potential वाचक वर्ग दिसत असतो.

हो, खरंय की आमची पिढी आज जास्त करून इंग्लिश साहित्य वाचते, पण त्याला काही पर्याय ही नाहीए. सुंदर इंग्लिश साहित्य जर सहज रित्या उपलब्ध होणार असेल तर का लोकांनी त्यापासून दूर रहायचं? मराठीत खूप सुंदर साहित्य निर्माण झालंय. पण त्याचा वेग आज खूप मंदावलाय. मराठी पुस्तकांची भिस्त अजूनही जर श्री.ना. पेंडसे, गो.ना.दातार, पु.ल., व.पु., जी.ए., यांच्यावरच अवलंबून राहणार असेल तर खरंच कठीण आहे आमचं. यासाठी नाही की यांची पुस्तकं आज वाचनीय नाहीएत. तर यासाठी कारण गेली ४०-५० वर्ष बिचारी हीच मंडळी हा भार उचलत आहेत.

मला खरा प्रॉब्लेम यंग वाचकवर्ग मिळत नाहीए हा वाटत नसून यंग जनरेशन मराठी लेखनाकडे जास्त फिरकत नाहीए हा वाटतो.  एका १२-१३ वर्षांच्या मुलासमोर ५० वर्ष जुनं लॉर्ड ऑफ द रिंग्स, २० वर्ष जुनं फेमस फाईव, आणि अगदी आत्ता आत्ताचं हैरी पॉटर असे कितीतरी पर्याय उपलब्ध असतात. मराठीत काय दिसतं? आपण आजही बाळ साहित्य म्हणलं की भा.रा. भागवत आणि फास्टर फेणे इथे येऊन थांबतो. कितीही म्हणलं तरी आजचा १२-१३ वर्षांचा मुलगा/मुलगी गोट्या, चिंगी, वसंत, फास्टर फेणे यांच्याशी कित्येकदा स्वतःला relate नाही करू शकत. त्याला त्या व्यक्तिरेखा परक्या वाटतात. तेच कथा कादंबऱ्यांचं.

बरं परत नवीन पिढी ने लिहिण्याकडे वळावं असं म्हणाल तर त्यातही हजार लफडी आहेत. समजा मी एखादा लेख, एखादी कथा लिहिली तर ती लोकांपर्यंत कशी पोहोचवणार? आज मराठी मासिकांची झालेली परिस्थिती आपण सगळे बघतोच. शेवटी लिहिलेलं ते फेसबुक च्या नोट्स मधे, किंवा खूपच झालं तर ब्लॉग वर share करायचं आणि स्वस्थ बसायचं. आज गरज आहे जास्तीत जास्त लोकांना लिहायला प्रवृत्त करायची, आणि चांगल्या लेखनाला व्यासपीठ उपलब्ध करून द्यायची.

इंग्लिश पुस्तकं जेवढ्या सहजपणे इंटरनेट वर ई-बुक्स च्या माध्यमातून उपलब्ध आहेत त्या मानाने मराठी पुस्तकं कुठेच नाहीत, याचाही विचार व्हायला हवा. मी आज बरीच इंग्लिश पुस्तकं टॅब वर वाचतो, हीच सोय मला मराठी पुस्तकांसाठी मिळत नाही याची खंत वाटते.

खरंच खूप काही आहे करायला. कधी कधी मलाच उद्विग्नता येते. खरतरं वाचायला उत्सुक लोकं आहेत, पुस्तकंही आहेत. मग काय चुकतंय नेमकं? कळत नाही. जाऊदेत. आपल्याकडून होतंय तेवढं करावं आणि नाहीच जमलं काही तर किमान नव नवीन  पुस्तकांचा आनंद तरी घ्यावा. अगदी काही नाही तरी नवीन पुस्तकं विकत घेणे, मित्र- मैत्रिणींबरोबर पुस्तकांवर चर्चा करणे, आणि आवडलेले पुस्तक ओळखीच्यांना वाचायला देणे एवढं तरी आपण नक्कीच करू शकतो.

तर मुद्दा हा की खूप वाचूया, जमेल तसं लिहूया, आणि एखादं पुस्तकं आवडल्यास मराठी पुस्तक मित्र द्वारे ते लोकांपर्यंत देखील पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात 🙂

मराठी पुस्तक मित्र कडून जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 
 

टॅग्स: , , , , ,