RSS

लंपन चे भावविश्व – भाग २ (पंखा, झुंबर) – प्रकाश नारायण संत

08 जानेवारी

लंप्या.. हळू हळू मोठा होऊ लागलेला. आजूबाजूच्या परिस्थितींच भान येऊ लागलेला. पंखा आणि झुंबर या दोन्हीही पुस्तकांमध्ये मला लंपन थोडा मोठा झालेला वाटतो. त्याचे विचार, आजूबाजूची परिस्थिती, त्याचं वागणं, सगळंच. संतांनी ही दोन्ही पुस्तकं खूप तरलतेने लिहिली आहेत.

मध्यंतरी कोणीतरी दिलीप प्रभावळकरांची मुलाखत घेत असताना त्यांना विचारलं तुम्ही बाल साहित्य लिहिलेलं आहे. बोक्या हा तुमचा मानसपुत्र. मग बाकीच्या बाल साहित्यामध्ये उदाहरणार्थ लंपन आणि तुमच्या बोक्या मध्ये तुम्हाला काय साम्य जाणवतं? (ह्या मुलाखतकाराला शिक्षा म्हणून साहित्य संमेलनाचं reporting करायला पाठवलं असं ऐकण्यात आलं.)

पंखा आणि झुंबर सारखी दोन इतकी अप्रतिम पुस्तकं लिहिल्यानंतरही जर कोणी संतांच्या पुस्तकांना बाल साहित्य म्हणत असेल तर कठीण आहे. आपल्याकडे बाल साहित्याबद्दल इतके टोकाचे गैरसमज आहेत कि विचारायची सोय नाही. एखाद्या कथेचं मुख्य पात्र लहान असलं कि झालं ते बाल साहित्य. मग झुंबर, शाळा सगळं बाल साहित्य. (माझ्या एका मित्राच्या आईने शाळा लहान मुलांसाठी असलेलं पुस्तक आहे असं समजून त्याला ते ६वीत वाचायला दिलं. त्यानंतर त्याने प्रेरित होऊन आईला, आई line देणे म्हणजे नक्की काय देणे गं असा जबरी प्रश्न विचारून तिचं शाळा बद्दल चं मत इतकं गढूळ केलं कि नंतर आम्ही कॉलेज मध्ये असताना शाळा हा सिनेमा आला, तर आईने तो सुद्धा बघू दिला नाही म्हणे)

पंखा हे लंपन मालिकेतलं तिसरं पुस्तक, तर झुंबर हे चौथं आणि शेवटचं. झुंबर ची शेवटची कथा लिहितानाच संत गेले. ती कथा त्या पुस्तकात अर्धवटच आहे. पंखा मधल्या ८ ही कथांमध्ये लंपन हे मूळ पात्र खूप स्पष्ट होत जातं. एखादा माणूस वयाच्या १२व्या १३व्या वर्षी जसा हळू हळू जाणीवांनी आणि नेणीवांनी विकसित होत जातो तसच लंपन हे पात्र सुद्धा. आणि त्यामुळे त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमध्ये आपण अजून जास्त रस घेऊ लागतो. त्याच्या आजी आजोबांचं सुद्धा जगण्याचं सूत्र मनाला कुठेतरी खूप भावतं. लंपन च्या आजीचं जगण्याचं तत्वज्ञान आणि विचारांची शुध्दता खूप विशुद्ध आणि स्पष्ट आहे आणि ती खूप छान click होते.

Zumbar-Prakash Narayan Sant

Zumbar-Prakash Narayan Sant

या चारही पुस्तकांमध्ये thematically विचार करता झुंबर हे माझं आवडतं पुस्तक. लंपन चे वडील जाणं, त्यातून त्याचं भावविश्व कोसळण हे एवढं संवेदनशील आणि मनाला टोचणारं आहे, की त्यातून लंपनच्या स्वभावाबद्दल अपार कुतूहल तयार होतं. लंपन चं त्या धक्क्याने एकदम प्रौढ होणं, serious होणं, हा या मालिकेसाठी अगदी चपखल बसणारा अंत आहे. दुर्दैव हेच कि हा अंत पूर्णपणे कागदावर उतरला नाही. एखाद्या कलेचं अपूर्णत्व कित्येकदा त्या कलेबद्दल चं आकर्षण हजार पटीने वाढवतं. तसचं काहीसं झुंबर चं सुद्धा होतं.

मी लंपन चे भावविश्व भाग १ लिहिलं तेव्हा दोघा-तिघांनी facebook वर म्हणलं कि शेवटच्या दोन पुस्तकांना पहिल्या दोन पुस्तकांची सर नाही. झुंबर हे पुस्तक मोनोटोनस होतं असंही काही लोकं म्हणाली. मला माहित नाही. असेल ही. तुम्ही लंपन ची मालिका कुठल्या अपेक्षेने वाचता यावर पण बर्याच गोष्टी ठरतात. माझ्याप्रमाणे मात्र या चारही पुस्तकांचा ग्राफ वर वर चढत जातो आणि शेवटचं अपूर्णत्व या मालिकेची चरमसीमा गाठतं. झुंबर संपवल्यावर डोळ्यांच्या कडेवर साचणारं पाणी आणि लंपन च्या अजून गोष्टी का नाहीत हा मनात येणारा बालहट्ट ही या व्यक्तिरेखेची आणि त्याचबरोबर संतांच्या लेखनाची यशाची पावती. १७६० वेळा वाचलं तरी शेवटच्या पानावर डोळ्यांच्या कडा ओल्या होतात त्या होतातच. नाईलाज आहे.

असं काही झालं कि मी प्रकाश नारायण संतानी लिहिलेल्या अफाट शब्दरचना आठवतो. ओठांवर आपोआप हसू येतं. येणारच. नकादुचेण्या पकासके वाचून पण हसू न फुटलेला संतांचा वाचक मी अजून तरी बघितलेला नाहीये.

(Image Courtesy – http://www.bookganga.com  या वेबसाईट वर तुम्हाला झुंबर या पुस्तकाची काही पानं वाचायला पण मिळतील.)

Advertisements
 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: