RSS

जागतिक पुस्तक मेळावा अर्थात World Book Fair 2013 at Frankfurt

20 ऑक्टोबर

मी वाचनाच्या बाबतीत बरेचदा खूप lucky राहिलोय. कॉलेज शिक्षणाची सुरुवातच पुण्यापासून झाली. त्यामुळे या न त्या कारणाने पुस्तकं, लेखक, साहित्य संमेलन या गोष्टींशी संबंध येतच राहिला. त्या नंतर पुढे अजून शिकायचा निर्णय घेतला आणि येऊन पडलो फ्रांकफुर्ट मध्ये. Gutenberg या आधुनिक प्रिंटींग च्या जनकाच्या गावापासून अगदी एका तासाच्या अंतरावर.

याच Gutenberg मुळे आज आपण एवढ्या सुलभतेने पुस्तकं विकत घेऊन वाचू शकतो. Gutenberg मुळेच एका अर्थाने पुस्तकांच्या मास प्रोडक्शन ला सुरुवात झाली. Gutenberg ने १४३९ च्या दरम्यान पहिले movable प्रिंटर बनवले आणि त्याच्या ५०-६० वर्षांमध्येच युरोप मध्ये मोठ्या प्रमाणावर पुस्तक छपाई सुरु झाली. पण आता ही छापलेली पुस्तकं विकायची कशी? तर त्या साठी सुरु झाला पुस्तक मेळावा, फ्रांकफुर्ट मध्ये. आणि आज हाच मेळावा जगातला सगळ्यात मोठा पुस्तक मेळावा म्हणून नावाजलेला आहे. तर अश्या या पुस्तक मेळाव्यात मला फ्रांकफुर्ट मध्ये पदार्पणाच्या पहिल्या महिन्यातच जायची संधी मिळाली.

Frankfurt world book fair चा इतिहास जवळ जवळ ५०० वर्ष जुना आहे. जर्मनी मधल्या जवळपास सगळ्याच शहरांमध्ये असतो तशी Frankfurt मध्ये पण एक Messe (ज्याला इंग्लिश मध्ये Fair म्हणतात) अशी जागा आहे जिथे सगळी मोठी exhibitions भरतात. Frankfurt book fair सुद्धा दरवर्षी ऑक्टोबर च्या मध्यात तिथेच भरते. मी जाताना काहीतरी मोठं बघायला जातोय अशी मनाची तयारी करून गेलो आणि तिथे जाऊन भोवळ येऊन पडायचाच बाकी राहिलो. मोठं म्हणजे तरी किती मोठं. मोठे च्या मोठे halls, प्रचंड मोठ्या जागेत पसरलेले बुक stalls, चित्रविचित्र देशांची लोकं आणि पुस्तकं.. मला तर अगदी अली बाबा ची गुफा सापडल्याचा आनंद झाला.

तिथे कुठल्या देशातून लोकं नव्हती आली? उगांडा, नामिबिया, अंगारा, पासून ते उरुग्वे, चिले, आणि इराण, इराक, तेहरान पासून ते जपान, कोरिया, आणि मंगोलिया पर्यंत. देशाचं नाव घ्या आणि stall हजर. भाषेचं नाव घ्या आणि पुस्तक हजर. (अपवाद मराठी. पण त्यावर मी नंतर येईनच)

इराण मधून आलेल्या पुस्तक विक्रेत्यांनी त्यांच्या पुस्तक बांधणीच्या कलेचं प्रदर्शन ठेवलं होतं. उगांडा, मंगोलिया सारख्या देशांच्या पुस्तकांची तर भाषा कळणे दूर अक्षर ओळख सुद्धा होत नव्हती. अगदी लहान लहान देशांच्या लोकांनी पण मोठे मोठे सिनेमांच्या सेट सारखे stalls उभे केले होते. हे सगळं बघून मी भारताचा stall बघायला अजूनच उत्सुक झालो. पण अर्धा तास झाला शोधतोय तरी stall च सापडेना. counter वर जो stall नंबर सांगितला होता तो काही केल्या सापडेचना. शेवटी असा इथे तिथे बाल्या सारखा बघत असताना मागून आवाज आला ‘जी आजकल गांधी जी को कोई खरीदता नही है ना, मार्केट value कम हो गयी है उनके किताबो की, पर आंबेडकर जी के बारे मी बडा क्रेज बढा है बाहर के लोगो में’

म्हणलं चला भेटला कोणीतरी इंडिअन. म्हणून मागे वळून बघितलं तर एका लहानश्या बूथ समोर उभा राहून एक टीपीकल पंजाबी गृहस्थ एका सरदारजीना धंद्याचं गणित समजावून सांगत होता. मी म्हणलं एवढासा बूथ इंडिया चा? शक्यच नाही. म्हणून जाऊन त्या माणसाशी बोललो. तेव्हा कळले कि लोकल करन्सी मधून पैसे देण्यावरून वादावादी झाल्यामुळे (अथवा तत्सम काहीतरी, मला कारण नीटसे कळले नाही) ९९% भारतीय पुस्तक विक्रेता विदेशी पुस्तकांसाठी असलेलं खास दालन सोडून कुठल्या तरी तिसर्याच दालनात निघून गेलेत. मनात म्हणलं कठीण आहे. पुस्तक मेळावा हा फ़क़्त धंदा मिळवण्याचे स्थान नसून तुमची वाचन संस्कृती जगापर्यंत पोचवण्याचे माध्यम आहे हे या प्रकाशकांना कोण जाऊन समजावेल?

मी आपला गप तिथून निघालो आणि ते ८ नंबर चं दालन शोधण्यासाठी पायपीट करू लागलो. तुम्हाला वाटेल एवढी काय पायपीट असणार पण विश्वास ठेवा मला तिथपर्यंत पोचायला तब्बल २० मिनिट लागले. तरी बरं मध्ये सगळीकडे conveyor belts होते, नाहीतर पायाचे तुकडेच पडले असते.

Image

८ नंबर चं दालन निघालं तांत्रिक आणि शैक्षणिक पुस्तकाचं.  म्हणलं इथे भारतीय पुस्तकं कुठून येऊन बसली. पण तो संशय सुद्धा लौकरच स्पष्ट झाला. सर्वात आधी दिसला भारताचा तिरंगा आणि त्यापाठोपाठ दिसले ते शब्द नेशनल बुक ट्रस्ट, इंडिया . म्हणलं चला जागा वेगळी असली तरी थोडाफार का होईना दिमाख आहे. उत्साहाने गेलो तर stall वरचा माणूस आत ऑफिसमध्ये झोपला होता. मी म्हणलं आपण पण अगदी वामकुक्षी च्या वेळेस पोचलोय. जाऊदेत म्हणून पुस्तकं बघायला सुरुवात केली तर ८०% पुस्तकं इंग्लिश मधली. हा भारतीय पुस्तकांचा stall आहे इथे तरी भारतीय भाषांमधली पुस्तकं ठेवा रे असं कळकळीने ओरडून सांगावस वाटलं. उरलेली २०% पुस्तकं हिंदी मध्ये असली तरी त्यांचं प्रकाशन साल १९७० च्या पुढे गेलच नव्हतं. म्हणजे कोणी दुसर्या देशाचा माणूस बघायला आला तर त्याला वाटावं कि हिंदी मध्ये १९७० नंतर लेखन झालंच नाहीये. नाही म्हणलं तरी माझा हिरमोड झालाच. म्हणलं जाउदेत हा सरकारी stall आहे बाकी प्रकाशक तरी घेऊन आले असतील वाचनीय पुस्तकं, म्हणून त्यांच्याकडे मोर्चा वळवला. त्यातले १००% पुस्तकं निघाले इंग्लिश मध्ये आणि त्यातलेही ७०% पुस्तकं एकतर लहान मुलांची किंवा तंत्र शिक्षणाची. म्हणलं काय सुरुये हे. बरं लहान मुलांच्या पुस्तकांना पण मी कमी लेखत नाही पण त्यात तरी काही साहित्यिक भाग नको का. नाहीच.

एकाला विचारलं मराठी प्रकाशक कोणी आलाय का? तो माझ्याकडे बघून हसूच लागला. म्हणे भैया यहां तो लगभग सभी दिल्ली वाले है. फिर भी आप घूम के देख लो. पण भारताला दिलेली जागा अशी काही खूप मोठी नव्हतीच कि फिरून बिरून बघावं लागेल.

खूप वाईट वाटलं. आपण नुसत्या शिव्या घालत बसायचं, मातृभाषेतल्या साहित्याला कोणी वाली नाही, हिंदी मराठी आज कोणाला वाचायचं नसतं, यंग जनरेशन फक्त इंग्लिश वाचते वगैरे वगैरे. आणि जेव्हा आपल्याच साहित्याला जगासमोर आणण्याची वेळ येते तेव्हा हे असं काहीतरी.

या सगळ्यामागे ही खूप कारणं असतील. पैसा, सीमित वाचक वर्ग, साधनांची कमी वगैरे वगैरे कारणं लोकं हे वाचल्यानंतर बहुदा माझ्या तोंडावर फेकतील ही. पण ह्यानंतर मराठी साहित्य जगताने मराठी ला कोणी वाली नाही हे रडगाणं गाण्याचा हक्क गमावलेला आहे हे मात्र खरं. जो समाज आपल्या साहित्याचा आदर करतो तो खरा सुसंस्कृत समाज.

उत्साहावर पडलेलं विरजण दूर करत मी त्या जागेतून बाहेर पडत होतो तेवढ्यात बाजूला एक लहानसा बूथ दिसला. अगदीच छोटा. एक मध्यमवयीन नवरा बायको आत बसेलेले. बायको अतिशय कंटाळली होती. बूथ होता बंगाली पुस्तकांचा. आणि माझ्या आश्चर्याने तिथले एकुणेक पुस्तक बंगालीत होते. अगदी Tintin चा अनुवाद सुद्धा.

चला एक तरी भारतीय भाषा आपले प्रतिनिधित्व करायला इथे आहे हे बघून बरं वाटलं. तो बंगाली बाबू सुद्धा प्रेमाने बोलला. मी म्हणलं इतकी कमी भारतीय भाषांमधली पुस्तकं बघून वाईट वाटलं. तर तो हसून म्हणला ‘ इंडिअन भाषा मी बुक्स नाही है क्योंकी कोई लेता नही है, और कोई लेता नाही क्योंकी ये बेचते नही’. मनात म्हणलं अगदी रस्गुल्ल्यासारख गोल गोल बोलतोस गड्या.

काय माहित. खरतर इथे बसून बोलणं खूप सोपं आहे. तिथे बूथ लावायला काय पापड वळावे लागत असतील हे मला तरी काय माहित.

पण एक मात्र खरं कि आपल्या गावापासून हजारो kilometres दूर, वेगळ्या संस्कृतीत, वेगळ्या भाषाविश्वात राहत असताना, त्यातल्या त्यात  घरपण देतात ती आपल्या भाषेतली पुस्तकं. त्यामुळे एक मराठी वाचक म्हणून तरी माझा खूप हिरमोड झाला.

जाउदेत. पुढच्या वर्षी तरी चित्र बदलेल अशी अपेक्षा घेऊन बंगाली बाबूंना bye म्हणून मी काही चांगले फोटोस काढायला कॉमिक section कडे वळलो. मनात एक किडा मात्र कुठेतरी वळवळत होता. या अश्या मंचांवर मराठी साहित्याला चांगलं प्रतिनिधित्व मिळालं असतं तर आज विश्व साहित्यात पु.लं., व.पु., जी.ए., भा.रा. भागवत, नेमाडे कुठे पोचले असते.

Advertisements
 
3 प्रतिक्रिया

Posted by on ऑक्टोबर 20, 2013 in पुस्तकं

 

टॅग्स: , , ,

3 responses to “जागतिक पुस्तक मेळावा अर्थात World Book Fair 2013 at Frankfurt

 1. navnathrao

  ऑक्टोबर 21, 2013 at 4:05 सकाळी

  आपले साहित्यिक साहित्य संमेलनाच्या निवडणुकीवरून वाद घालत बसतील पण जागतिक स्तरावर आपल्या भाषेतील साहित्य कसे पोहचेल, यावर अवाक्षर उच्चारणार नाहीत. अन्य भाषांइतकच आपले साहित्य दर्जेदार आहे.

   
 2. indraneelpole

  ऑक्टोबर 21, 2013 at 7:12 pm

  अगदी खरंय नवनाथ.. 🙂

   
 3. कविता महाजन

  नोव्हेंबर 15, 2013 at 4:17 सकाळी

  चांगला लेख आहे इंद्रनील. यात अर्थात दुसरे मुद्दे आहेतच. खासकरून आर्थिक. पण सरकार अशा उपक्रमांना मदत करत असतं. साहित्य अकादेमी, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया इत्यादी संस्थांकडून अनेक उपक्रम राबवले जातात. तिथले अध्यक्ष व कर्मचारी कसे आहेत ( जे बदलत असतात काही वर्षांनी ) यावर ते अवलंबून आहे.

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: