RSS

लंपन चे भावविश्व – भाग २ (पंखा, झुंबर) – प्रकाश नारायण संत

लंप्या.. हळू हळू मोठा होऊ लागलेला. आजूबाजूच्या परिस्थितींच भान येऊ लागलेला. पंखा आणि झुंबर या दोन्हीही पुस्तकांमध्ये मला लंपन थोडा मोठा झालेला वाटतो. त्याचे विचार, आजूबाजूची परिस्थिती, त्याचं वागणं, सगळंच. संतांनी ही दोन्ही पुस्तकं खूप तरलतेने लिहिली आहेत.

मध्यंतरी कोणीतरी दिलीप प्रभावळकरांची मुलाखत घेत असताना त्यांना विचारलं तुम्ही बाल साहित्य लिहिलेलं आहे. बोक्या हा तुमचा मानसपुत्र. मग बाकीच्या बाल साहित्यामध्ये उदाहरणार्थ लंपन आणि तुमच्या बोक्या मध्ये तुम्हाला काय साम्य जाणवतं? (ह्या मुलाखतकाराला शिक्षा म्हणून साहित्य संमेलनाचं reporting करायला पाठवलं असं ऐकण्यात आलं.)

पंखा आणि झुंबर सारखी दोन इतकी अप्रतिम पुस्तकं लिहिल्यानंतरही जर कोणी संतांच्या पुस्तकांना बाल साहित्य म्हणत असेल तर कठीण आहे. आपल्याकडे बाल साहित्याबद्दल इतके टोकाचे गैरसमज आहेत कि विचारायची सोय नाही. एखाद्या कथेचं मुख्य पात्र लहान असलं कि झालं ते बाल साहित्य. मग झुंबर, शाळा सगळं बाल साहित्य. (माझ्या एका मित्राच्या आईने शाळा लहान मुलांसाठी असलेलं पुस्तक आहे असं समजून त्याला ते ६वीत वाचायला दिलं. त्यानंतर त्याने प्रेरित होऊन आईला, आई line देणे म्हणजे नक्की काय देणे गं असा जबरी प्रश्न विचारून तिचं शाळा बद्दल चं मत इतकं गढूळ केलं कि नंतर आम्ही कॉलेज मध्ये असताना शाळा हा सिनेमा आला, तर आईने तो सुद्धा बघू दिला नाही म्हणे)

पंखा हे लंपन मालिकेतलं तिसरं पुस्तक, तर झुंबर हे चौथं आणि शेवटचं. झुंबर ची शेवटची कथा लिहितानाच संत गेले. ती कथा त्या पुस्तकात अर्धवटच आहे. पंखा मधल्या ८ ही कथांमध्ये लंपन हे मूळ पात्र खूप स्पष्ट होत जातं. एखादा माणूस वयाच्या १२व्या १३व्या वर्षी जसा हळू हळू जाणीवांनी आणि नेणीवांनी विकसित होत जातो तसच लंपन हे पात्र सुद्धा. आणि त्यामुळे त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमध्ये आपण अजून जास्त रस घेऊ लागतो. त्याच्या आजी आजोबांचं सुद्धा जगण्याचं सूत्र मनाला कुठेतरी खूप भावतं. लंपन च्या आजीचं जगण्याचं तत्वज्ञान आणि विचारांची शुध्दता खूप विशुद्ध आणि स्पष्ट आहे आणि ती खूप छान click होते.

Zumbar-Prakash Narayan Sant

Zumbar-Prakash Narayan Sant

या चारही पुस्तकांमध्ये thematically विचार करता झुंबर हे माझं आवडतं पुस्तक. लंपन चे वडील जाणं, त्यातून त्याचं भावविश्व कोसळण हे एवढं संवेदनशील आणि मनाला टोचणारं आहे, की त्यातून लंपनच्या स्वभावाबद्दल अपार कुतूहल तयार होतं. लंपन चं त्या धक्क्याने एकदम प्रौढ होणं, serious होणं, हा या मालिकेसाठी अगदी चपखल बसणारा अंत आहे. दुर्दैव हेच कि हा अंत पूर्णपणे कागदावर उतरला नाही. एखाद्या कलेचं अपूर्णत्व कित्येकदा त्या कलेबद्दल चं आकर्षण हजार पटीने वाढवतं. तसचं काहीसं झुंबर चं सुद्धा होतं.

मी लंपन चे भावविश्व भाग १ लिहिलं तेव्हा दोघा-तिघांनी facebook वर म्हणलं कि शेवटच्या दोन पुस्तकांना पहिल्या दोन पुस्तकांची सर नाही. झुंबर हे पुस्तक मोनोटोनस होतं असंही काही लोकं म्हणाली. मला माहित नाही. असेल ही. तुम्ही लंपन ची मालिका कुठल्या अपेक्षेने वाचता यावर पण बर्याच गोष्टी ठरतात. माझ्याप्रमाणे मात्र या चारही पुस्तकांचा ग्राफ वर वर चढत जातो आणि शेवटचं अपूर्णत्व या मालिकेची चरमसीमा गाठतं. झुंबर संपवल्यावर डोळ्यांच्या कडेवर साचणारं पाणी आणि लंपन च्या अजून गोष्टी का नाहीत हा मनात येणारा बालहट्ट ही या व्यक्तिरेखेची आणि त्याचबरोबर संतांच्या लेखनाची यशाची पावती. १७६० वेळा वाचलं तरी शेवटच्या पानावर डोळ्यांच्या कडा ओल्या होतात त्या होतातच. नाईलाज आहे.

असं काही झालं कि मी प्रकाश नारायण संतानी लिहिलेल्या अफाट शब्दरचना आठवतो. ओठांवर आपोआप हसू येतं. येणारच. नकादुचेण्या पकासके वाचून पण हसू न फुटलेला संतांचा वाचक मी अजून तरी बघितलेला नाहीये.

(Image Courtesy – http://www.bookganga.com  या वेबसाईट वर तुम्हाला झुंबर या पुस्तकाची काही पानं वाचायला पण मिळतील.)

Advertisements
 

जागतिक पुस्तक मेळावा अर्थात World Book Fair 2013 at Frankfurt

मी वाचनाच्या बाबतीत बरेचदा खूप lucky राहिलोय. कॉलेज शिक्षणाची सुरुवातच पुण्यापासून झाली. त्यामुळे या न त्या कारणाने पुस्तकं, लेखक, साहित्य संमेलन या गोष्टींशी संबंध येतच राहिला. त्या नंतर पुढे अजून शिकायचा निर्णय घेतला आणि येऊन पडलो फ्रांकफुर्ट मध्ये. Gutenberg या आधुनिक प्रिंटींग च्या जनकाच्या गावापासून अगदी एका तासाच्या अंतरावर.

याच Gutenberg मुळे आज आपण एवढ्या सुलभतेने पुस्तकं विकत घेऊन वाचू शकतो. Gutenberg मुळेच एका अर्थाने पुस्तकांच्या मास प्रोडक्शन ला सुरुवात झाली. Gutenberg ने १४३९ च्या दरम्यान पहिले movable प्रिंटर बनवले आणि त्याच्या ५०-६० वर्षांमध्येच युरोप मध्ये मोठ्या प्रमाणावर पुस्तक छपाई सुरु झाली. पण आता ही छापलेली पुस्तकं विकायची कशी? तर त्या साठी सुरु झाला पुस्तक मेळावा, फ्रांकफुर्ट मध्ये. आणि आज हाच मेळावा जगातला सगळ्यात मोठा पुस्तक मेळावा म्हणून नावाजलेला आहे. तर अश्या या पुस्तक मेळाव्यात मला फ्रांकफुर्ट मध्ये पदार्पणाच्या पहिल्या महिन्यातच जायची संधी मिळाली.

Frankfurt world book fair चा इतिहास जवळ जवळ ५०० वर्ष जुना आहे. जर्मनी मधल्या जवळपास सगळ्याच शहरांमध्ये असतो तशी Frankfurt मध्ये पण एक Messe (ज्याला इंग्लिश मध्ये Fair म्हणतात) अशी जागा आहे जिथे सगळी मोठी exhibitions भरतात. Frankfurt book fair सुद्धा दरवर्षी ऑक्टोबर च्या मध्यात तिथेच भरते. मी जाताना काहीतरी मोठं बघायला जातोय अशी मनाची तयारी करून गेलो आणि तिथे जाऊन भोवळ येऊन पडायचाच बाकी राहिलो. मोठं म्हणजे तरी किती मोठं. मोठे च्या मोठे halls, प्रचंड मोठ्या जागेत पसरलेले बुक stalls, चित्रविचित्र देशांची लोकं आणि पुस्तकं.. मला तर अगदी अली बाबा ची गुफा सापडल्याचा आनंद झाला.

तिथे कुठल्या देशातून लोकं नव्हती आली? उगांडा, नामिबिया, अंगारा, पासून ते उरुग्वे, चिले, आणि इराण, इराक, तेहरान पासून ते जपान, कोरिया, आणि मंगोलिया पर्यंत. देशाचं नाव घ्या आणि stall हजर. भाषेचं नाव घ्या आणि पुस्तक हजर. (अपवाद मराठी. पण त्यावर मी नंतर येईनच)

इराण मधून आलेल्या पुस्तक विक्रेत्यांनी त्यांच्या पुस्तक बांधणीच्या कलेचं प्रदर्शन ठेवलं होतं. उगांडा, मंगोलिया सारख्या देशांच्या पुस्तकांची तर भाषा कळणे दूर अक्षर ओळख सुद्धा होत नव्हती. अगदी लहान लहान देशांच्या लोकांनी पण मोठे मोठे सिनेमांच्या सेट सारखे stalls उभे केले होते. हे सगळं बघून मी भारताचा stall बघायला अजूनच उत्सुक झालो. पण अर्धा तास झाला शोधतोय तरी stall च सापडेना. counter वर जो stall नंबर सांगितला होता तो काही केल्या सापडेचना. शेवटी असा इथे तिथे बाल्या सारखा बघत असताना मागून आवाज आला ‘जी आजकल गांधी जी को कोई खरीदता नही है ना, मार्केट value कम हो गयी है उनके किताबो की, पर आंबेडकर जी के बारे मी बडा क्रेज बढा है बाहर के लोगो में’

म्हणलं चला भेटला कोणीतरी इंडिअन. म्हणून मागे वळून बघितलं तर एका लहानश्या बूथ समोर उभा राहून एक टीपीकल पंजाबी गृहस्थ एका सरदारजीना धंद्याचं गणित समजावून सांगत होता. मी म्हणलं एवढासा बूथ इंडिया चा? शक्यच नाही. म्हणून जाऊन त्या माणसाशी बोललो. तेव्हा कळले कि लोकल करन्सी मधून पैसे देण्यावरून वादावादी झाल्यामुळे (अथवा तत्सम काहीतरी, मला कारण नीटसे कळले नाही) ९९% भारतीय पुस्तक विक्रेता विदेशी पुस्तकांसाठी असलेलं खास दालन सोडून कुठल्या तरी तिसर्याच दालनात निघून गेलेत. मनात म्हणलं कठीण आहे. पुस्तक मेळावा हा फ़क़्त धंदा मिळवण्याचे स्थान नसून तुमची वाचन संस्कृती जगापर्यंत पोचवण्याचे माध्यम आहे हे या प्रकाशकांना कोण जाऊन समजावेल?

मी आपला गप तिथून निघालो आणि ते ८ नंबर चं दालन शोधण्यासाठी पायपीट करू लागलो. तुम्हाला वाटेल एवढी काय पायपीट असणार पण विश्वास ठेवा मला तिथपर्यंत पोचायला तब्बल २० मिनिट लागले. तरी बरं मध्ये सगळीकडे conveyor belts होते, नाहीतर पायाचे तुकडेच पडले असते.

Image

८ नंबर चं दालन निघालं तांत्रिक आणि शैक्षणिक पुस्तकाचं.  म्हणलं इथे भारतीय पुस्तकं कुठून येऊन बसली. पण तो संशय सुद्धा लौकरच स्पष्ट झाला. सर्वात आधी दिसला भारताचा तिरंगा आणि त्यापाठोपाठ दिसले ते शब्द नेशनल बुक ट्रस्ट, इंडिया . म्हणलं चला जागा वेगळी असली तरी थोडाफार का होईना दिमाख आहे. उत्साहाने गेलो तर stall वरचा माणूस आत ऑफिसमध्ये झोपला होता. मी म्हणलं आपण पण अगदी वामकुक्षी च्या वेळेस पोचलोय. जाऊदेत म्हणून पुस्तकं बघायला सुरुवात केली तर ८०% पुस्तकं इंग्लिश मधली. हा भारतीय पुस्तकांचा stall आहे इथे तरी भारतीय भाषांमधली पुस्तकं ठेवा रे असं कळकळीने ओरडून सांगावस वाटलं. उरलेली २०% पुस्तकं हिंदी मध्ये असली तरी त्यांचं प्रकाशन साल १९७० च्या पुढे गेलच नव्हतं. म्हणजे कोणी दुसर्या देशाचा माणूस बघायला आला तर त्याला वाटावं कि हिंदी मध्ये १९७० नंतर लेखन झालंच नाहीये. नाही म्हणलं तरी माझा हिरमोड झालाच. म्हणलं जाउदेत हा सरकारी stall आहे बाकी प्रकाशक तरी घेऊन आले असतील वाचनीय पुस्तकं, म्हणून त्यांच्याकडे मोर्चा वळवला. त्यातले १००% पुस्तकं निघाले इंग्लिश मध्ये आणि त्यातलेही ७०% पुस्तकं एकतर लहान मुलांची किंवा तंत्र शिक्षणाची. म्हणलं काय सुरुये हे. बरं लहान मुलांच्या पुस्तकांना पण मी कमी लेखत नाही पण त्यात तरी काही साहित्यिक भाग नको का. नाहीच.

एकाला विचारलं मराठी प्रकाशक कोणी आलाय का? तो माझ्याकडे बघून हसूच लागला. म्हणे भैया यहां तो लगभग सभी दिल्ली वाले है. फिर भी आप घूम के देख लो. पण भारताला दिलेली जागा अशी काही खूप मोठी नव्हतीच कि फिरून बिरून बघावं लागेल.

खूप वाईट वाटलं. आपण नुसत्या शिव्या घालत बसायचं, मातृभाषेतल्या साहित्याला कोणी वाली नाही, हिंदी मराठी आज कोणाला वाचायचं नसतं, यंग जनरेशन फक्त इंग्लिश वाचते वगैरे वगैरे. आणि जेव्हा आपल्याच साहित्याला जगासमोर आणण्याची वेळ येते तेव्हा हे असं काहीतरी.

या सगळ्यामागे ही खूप कारणं असतील. पैसा, सीमित वाचक वर्ग, साधनांची कमी वगैरे वगैरे कारणं लोकं हे वाचल्यानंतर बहुदा माझ्या तोंडावर फेकतील ही. पण ह्यानंतर मराठी साहित्य जगताने मराठी ला कोणी वाली नाही हे रडगाणं गाण्याचा हक्क गमावलेला आहे हे मात्र खरं. जो समाज आपल्या साहित्याचा आदर करतो तो खरा सुसंस्कृत समाज.

उत्साहावर पडलेलं विरजण दूर करत मी त्या जागेतून बाहेर पडत होतो तेवढ्यात बाजूला एक लहानसा बूथ दिसला. अगदीच छोटा. एक मध्यमवयीन नवरा बायको आत बसेलेले. बायको अतिशय कंटाळली होती. बूथ होता बंगाली पुस्तकांचा. आणि माझ्या आश्चर्याने तिथले एकुणेक पुस्तक बंगालीत होते. अगदी Tintin चा अनुवाद सुद्धा.

चला एक तरी भारतीय भाषा आपले प्रतिनिधित्व करायला इथे आहे हे बघून बरं वाटलं. तो बंगाली बाबू सुद्धा प्रेमाने बोलला. मी म्हणलं इतकी कमी भारतीय भाषांमधली पुस्तकं बघून वाईट वाटलं. तर तो हसून म्हणला ‘ इंडिअन भाषा मी बुक्स नाही है क्योंकी कोई लेता नही है, और कोई लेता नाही क्योंकी ये बेचते नही’. मनात म्हणलं अगदी रस्गुल्ल्यासारख गोल गोल बोलतोस गड्या.

काय माहित. खरतर इथे बसून बोलणं खूप सोपं आहे. तिथे बूथ लावायला काय पापड वळावे लागत असतील हे मला तरी काय माहित.

पण एक मात्र खरं कि आपल्या गावापासून हजारो kilometres दूर, वेगळ्या संस्कृतीत, वेगळ्या भाषाविश्वात राहत असताना, त्यातल्या त्यात  घरपण देतात ती आपल्या भाषेतली पुस्तकं. त्यामुळे एक मराठी वाचक म्हणून तरी माझा खूप हिरमोड झाला.

जाउदेत. पुढच्या वर्षी तरी चित्र बदलेल अशी अपेक्षा घेऊन बंगाली बाबूंना bye म्हणून मी काही चांगले फोटोस काढायला कॉमिक section कडे वळलो. मनात एक किडा मात्र कुठेतरी वळवळत होता. या अश्या मंचांवर मराठी साहित्याला चांगलं प्रतिनिधित्व मिळालं असतं तर आज विश्व साहित्यात पु.लं., व.पु., जी.ए., भा.रा. भागवत, नेमाडे कुठे पोचले असते.

 
3 प्रतिक्रिया

Posted by on ऑक्टोबर 20, 2013 in पुस्तकं

 

टॅग्स: , , ,

एक मोठी सुट्टी आणि काही नवीन पुस्तकं..

एखादी गोष्ट खूप उत्साहाने सुरु करणं आणि नंतर आरंभशूरता संपली कि ती गोष्ट ओझं होणं हे बऱ्याच लोकांबद्दल खूप कॉमन असतं. माझे बरेच मित्र माझ्या ब्लॉगिंग बद्दल हेच म्हणत असतात. मी उगाच नवीन नवीन ब्लॉग सुरु करतो आणि त्यात लिहित मात्र काही नाही. प्रॉब्लेम असा आहे कि मला लिहायची आवड असली तरी मी मुळात अतिशय आळशी माणूस आहे. कित्येक कल्पना, लेख, गोष्टी, कविता या फ़क़्त या गोष्टी मुळे कागदावर (या प्रसंगात computer keyboard वर) उतरायच्या राहून जातात.

हा ब्लॉग सुरु केल्यावर मात्र मला आत्मविश्वास होता कि इथे मी माझा आळस झटकून नियमित पणे काही तरी खरडत राहीन. पण कित्येक गोष्टी अश्या घडल्या कि बऱ्याच पुस्तकांबद्दल इथे लिहायची इच्छा असूनही वेळ मिळाला नाही. आता मात्र आयुष्य काही काळासाठी थोडं निवांत झालं आहे आणि अशी आशा आहे कि पुस्तकांबद्दल लिहिणं परत सुरु होईल.

गेल्या ३-४ महिन्यात मी मराठी पुस्तकांपासून दूर होतो. एखादं असं पुस्तक सापडतच नव्हतं कि जे सगळी कामं सोडून वाचत बसायची इच्छा व्हावी. आता तर महाराष्ट्रापासून इतक्या लांब आल्यावर मराठी पुस्तकं मिळणार कुठे हा पण प्रश्नच आहे. (तरी मी येताना बरोबर काही मराठी पुस्तकं आणली आहेत) कोणाला माहित असेल कि जर्मनी मध्ये मराठी पुस्तकं मला कुठे मिळतील तर जरूर सांगावं. मी ऐकून आहे कि जर्मनी मध्ये एका University मध्ये मराठी विभाग आहे. ती University शोधून तिथे गेलं पाहिजे एकदा.

Keep Calm and Read On

मराठी पुस्तकं नाही, तरी गेल्या काही महिन्यात बरीच इंग्लिश पुस्तकं वाचून काढली. मुंबईतला almost सगळ्यांना माहित असलेला फ्लोरा फांउंटेन जवळचा पुस्तकांचा अड्डा कसा काय माहित नाही पण मला माहितच नव्हता. काही महिन्यांपूर्वी तो कळला आणि अलिबाबा ची गुफा सापडल्या सारखा आनंद झाला. किती पुस्तकं, किती लेखक, किती विषय. लोकं मुंबई ला काय काय बघायला जातात. मी मात्र गेल्या तिन्ही चारी वेळेस फ़क़्त फ्लोरा फांउंटेन बघून परत आलो. सरड्याची धाव कुंपणापर्यंत.

असा एक विचार सुरु आहे कि याच ब्लॉग वर एक section इंग्लिश पुस्तकांविषयी लिहायला सुरु करावा. आजकाल इतक्या इंग्लिश पुस्तकांचे मराठी अनुवाद येऊ लागलेत कि मराठीत इंग्लिश पुस्तकांबद्दल कोणी लिहू लागलं तर आश्चर्य वाटू नये. बघूया कसा वेळ मिळतोय ते.

आत्ता पर्यंत वाचलेली इंग्लिश पुस्तकं बरीच वरवरची, सोप्या इंग्लिश मध्ये लिहिलेली आणि इंग्लिश मध्ये popular fiction म्हणतात त्या पठडीतली होती. गेल्या काही महिन्यात मात्र बरेच जुने लेखक सुद्धा वाचल्या गेले. Arthur C. Clarke, Haruki Murukami, Asimov, ओ’हेन्री, आयन रेंड, दोस्तोवस्की, जॉर्ज मार्टिन.. किती वेगवेगळे विषय. असिमोव, आर्थर क्लार्क वगैरे हे लेखक कमी आणि वैज्ञानिक जास्त वाटतात. असिमोव चे Three Laws of Artificial Intelligence तर मला इंजिनियरिंग मध्ये सुद्धा होते. एवढं असूनही यांच्या लेखनात कुठेही काही कमी वाटत नाही. अप्रतिम भाषा, विषयाचं सखोल ज्ञान, वाचकाची उत्कंठा ताणून ठेवणे, आणि वाचकाला विचार करायला उद्युक्त करणे. आर्थर क्लार्क यांच्या ३००१: A Final Odyssey या पुस्तकात तर मधेच एका जागी धर्म आणि त्याचं समाजात असलेलं अभिन्न स्थान यावर इतकं सुंदर विवेचन आहे कि हा माणूस विज्ञान कथा लेखक आहे का तत्वज्ञानाचा प्रोफेसर अशी शंका यावी. तेच असिमोव बद्दल. मराठीतले विज्ञान कथा लेखन तिथपर्यंत कधी पोचतंय याची मीच नाही तर बरेच वाचक वाट पाहत असतील याची मला खात्री आहे.

असंच एकदा फ्लोरा फांउंटेन ला गेलेलो असताना सत्यजित रे यांचं लघु कथांचं पुस्तक सापडलं. ह्या माणसाच्या सिनेमांमुळे त्यांचं लेखन झाकोळल्या गेलं असं माझं स्पष्ट मत आहे. आता दिबाकर बनर्जी सारखे लोकं त्यांच्या या काहीश्या माहित नसलेल्या कथांना परत प्रकाशात आणायचं काम करतायत हे चांगलंय. तरी उत्सुक लोकांनी पटोल बाबू फिल्मस्टार, बोंकू बाबू’र बोन्धू (हि कथा स्टीवन स्पीलबर्ग च्या ET या गाजलेल्या सिनेमा मागची प्रेरणा होती असं स्पीलबर्ग ने कुठेतरी म्हणून ठेवलंय), पिकू’र डायरी, अबीराम या कथा नक्की वाचाव्यात.

असो. तर मुद्दा असा कि मराठी पुस्तकांबद्दल असलेला हा ब्लॉग यापुढे नियमित पणे सुरु राहणार असून तुमच्याकडून सुद्धा नवीन पुस्तकांबद्दल काही चांगला मजकूर मला मिळेल अशी आशा आहे.

तोपर्यंत कीप काम एंड रीड अ मराठी बुक.

वाचू आनंदे.

 

टॅग्स: , , ,

लंपन चे भावविश्व – भाग १ (वनवास, शारदा संगीत) – प्रकाश नारायण संत

Vanvaas by Prakash Narayn Sant

Vanvaas by Prakash Narayn Sant

खरंतर लंपन चे भावविश्व हे एक पुस्तक नाही. ते भावविश्व ४ पुस्तकांमध्ये पसरलंय. त्यामुळेच त्यातलं एक पुस्तक घेऊन त्यावर लिहिणे हे जरा कठीण चं आहे. ज्यांनी प्रकाश नारायण संतांचे एक तरी पुस्तक वाचलंय ते लंपन ला नीटच ओळखत असतील. नुसताच लंपन नाही तर सुमी, बाबुराव, कर्णबर्गी गंग्या, जंब्या काटकोळ आणि इतर एकोणतीस गुणिले एकोणतीस गुणिले एकोणतीस लोकांनासुद्धा.

लंपन हा संतांचा मानसपुत्र. वय साधारण ११-१२ असेल. महाराष्ट्र कर्नाटक च्या सीमेवरील गावात त्याच्या आजी आजोबांबरोबर राहणारा. आई वडील हे दुसऱ्या गावी राहत असलेले. लंपन चे भावविश्व बऱ्याच प्रमाणात प्रकाश नारायण संतांच्या आयुष्यावर बेतलेले आहे. त्याबद्दल संतांनी पण वेळोवेळी सांगून ठेवलंय. (नुकत्याच प्रकाशित झालेल्या व त्यांच्या पत्नीने लिहिलेल्या ‘अमलताश’ या पुस्तकात या बद्दल सविस्तर माहिती असल्याचे ऐकून आहे. कोणी ते पुस्तक वाचले असल्यास विवेचन जरूर शेयर करावे.)

तर असा हा लंपन. तो, त्याचे संशोधक आजोबा, कडक स्वभावाची आजी (जिला आजोबाही अगदी बिचकून असतात), घरगडी बाबूराव, मैत्रीण सुमी, आणि त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या असंख्य लोकांची गोष्ट म्हणजे वनवास, शारदा संगीत, झुंबर, आणि पंखा ही चार पुस्तकं.

लंपन ची ओळख जगाला ६४ साली सत्यकथेतून वनवास नावाच्या कथेने झाली. पण त्यापुढे मात्र त्याची जास्त ओळख व्हायला ३० वर्ष लागली. संतांनी वनवास या एका कथेनंतर तब्बल तीस वर्षांनी पुढच्या कथा लिहिल्या. कधी कधी मला खूप वाईट वाटतं. संतांनी त्या ३० वर्षात लंपन बद्दल मौन नसतं बाळगलं तर आज कितीतरी सुंदर सुंदर लंपन च्या गोष्टी वाचायला मिळाल्या असत्या याचा विचार करून मनात हुरहूर वाटते. (इतक्यात प्रकाशित झालेल्या चांदण्याचे बेट  या पुस्तकात लंपनच्या अजून नवीन गोष्टी आहेत असे ऐकून आहे.) (मृणाल यांनी कॉमेंट्स मधे सांगितल्या प्रमाणे पुस्तकाचे नाव चांदण्याचा रस्ता असे आहे आणि त्यात लंपन ची एकाही गोष्ट नाही हे ऐकून वाईट वाटले)

वनवास आणि शारदा संगीत या दोन्ही पुस्तकांमधल्या गोष्टी अतिशय सध्या सोप्या आणि रोजच्या घडामोडीतल्या आहेत. म्हणूनच बहुदा त्या मनाला जास्त भावतात. मला ही पुस्तकं वाचताना नेहमी असं वाटतं की तो लंपन म्हणजे मीच आहे. लंपन चे कित्येक मित्र हे हुबेहूब माझ्या मित्रांसारखे भासतात. आपल्यालाही एखादी सुमी सारखी मैत्रीण असायला हवी होती असं मनात कुठेतरी वाटत राहतं.

त्यातून संतांनी लंपन च्या आजूबाजूचं जे चित्र उभं केलंय ते निव्वळ अप्रतिम आहे. लंपन चं घर, त्याची शाळा, शारदा संगीत विद्यालय, लंपन पेक्षा चाळीस एक वर्षांनी मोठे आणि तरीही लंपन ला गुरु म्हणणारे त्याचे संगीतातले शिष्य, तो कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरचा निसर्गरम्य परिसर हे सगळं पुस्तक वाचताना डोळ्यांसमोर अगदी मूर्तिमंत उभं राहतं. मी खरंतर कधी बेळगाव ला गेलेलो नाहीये, पण जर गेलोच तर मला खात्री आहे की लंपन मुळे तो परिसर मला नक्की ओळखीचा वाटेल.

तीच गम्मत भाषेची. वंटमुंगीकर देसाई, जंब्या काटकोळ, फासक्या बारदेसकर, गुंडीमठ रस्ता ही अशी नावं त्या भागात जन्म काढल्याशिवाय सुचायची नाहीत. सर्व कथांमधलं ते बेळगावी मराठी सुद्धा अतिशय सुंदर आहे. पुस्तकं वाचताना आपसूकचं ते हेल काढून वाचल्या जातं.

शारदा संगीत आणि वनवास ही दोन्ही पुस्तकं लंपन च्या लहान लहान गोष्टींनी भरलेली आहेत. प्रत्येक गोष्ट लंपन च्या आयुष्याचा आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा एक वेगळंच पैलू दाखवते. त्यातली मजा त्या कथेच्या नाट्यात नाही, त्याच्या कथावस्तूत देखील नाही. प्रकाश नारायण संतांना या गोष्टींची गरजचं भासलेली नाहीये. त्यातली मजा आहे त्यातल्या व्यक्तिरेखा, तो परिसर, ती भाषा आणि एकूणच संतांनी उभं केलेल्या त्या एका वेगळ्याच जगामध्ये. त्या जगात धावपळ, ऑफिस, प्रमोशन, करियर, मान सन्मान, होमवर्क, पहिला नंबर, शिक्षणाचा व्यापार, बस, टीवी, मोबाईल, राजकारण या कशाकशाला स्थान नाही.  शाळा आहे. पण म्हणून होमवर्क, ट्युशन, कोचिंग क्लासेस यांची लंपन ला गरज नाहीये. शारदा संगीत विद्यालय आहे. पण तिथला प्रत्येक मुलगा आणि मुलगी कुठल्याही रियालिटी शो मधे भाग घेण्यासाठी गाणं शिकत नसून स्वतःसाठी शिकत आहेत.

धड लहानही नाही आणि धड मोठे ही नाही असं ते पौगंडावस्थेतील जग खूप खूप सुंदर आणि हवहवसं वाटतं हेच या पुस्तकांच्या यशा मागचं रहस्य. पु. लं. नी म्हणलंय तसं ‘एकदा नाही, दोनदा नाही, तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा मॅड सारख्या वाचल्या तरी त्या ताज्याच वाटतात.’

लंपन च्या कथा वाचताना कित्येक जागी त्यात मला मी दिसतो. टारझन सारखं झाडावरून उडी मारताना, मॅडसारखं क्रिकेट खेळताना, सायकल पळवताना आणि अजून असंख्य वेळेस. जिथे जिथे मला मी दिसत नाही तिथे मी असा का नव्हतो हा विचार करून खूप वाईट वाटतं. मध्यंतरी मी आणि माझी एक मैत्रीण गप्पा मारत बसलो होतो तेव्हा ती मला म्हणाली ‘तुला लंपन एवढा का आवडतो माहित नाही. म्हणजे सगळी पुस्तकं सुंदर आहेत यात वाद नाहीच, पण सारखं वाचण्यासारखं काय आहे हे मला तरी कळत नाही. ती पुस्तकं वाचताना त्यात काही वेगळंच गवसल्याचा आनंद देणारं चित्र मला तरी दिसत नाही.’

मी म्हणलं ‘ते खरं ही असेल. पण प्रत्येक वेळेस ती पुस्तकं वाचताना मला माझंच बालपण गवसल्याचा आनंद होतो तो काय कमी आहे.’ तिला माझं बोलणं पटलं की नाही माहित नाही. पण दोन दिवसांनी ‘तुझ्या कडे शारदा संगीत आहे का रे?’ असं विचारायला तिचा फोन मात्र मला आला हे नक्की.

क्रमश:

 

टॅग्स: , , ,

जागतिक पुस्तक दिन अर्थात World Book Day

Image आज जागतिक पुस्तक दिन. खरंतर मला कधी कधी कळत नाही आपल्याला खरंच पुस्तकांसाठी अश्या एखाद्या दिवसाची गरज आहे का? म्हणजे मला मान्य आहे की अश्या दिवसांचा उपयोग होतो तो म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तकं पोहोचवण्यास, पण त्याच बरोबर हेही आहे की याद्वारे आपण पुस्तकांना एका विशिष्ट दिवसात बंद करून ठेवतो. म्हणजे एक दिवस पुस्तकांबद्दल भरभरून बोलायचं, क्रॉसवर्ड सारख्या शॉप्स मधे चक्कर टाकायची, ३-४ आकर्षक दिसणारी पुस्तकं विकत घ्यायची, आणि मग वर्षभर ती पुस्तकं लिविंग रूम मधे बुकशेल्फ वर सजवून ठेवायची.

खरंतर प्रत्येक व्यक्ती असंच वागते असं मला म्हणायचं नाही. पण हे सत्य आहे की आपल्यातले बरेच जण पुस्तक दिन या दिवशी याहून अधिक काही करत नाही. (काही महाभाग हे ही म्हणायला कमी करत नाहीत की एवढं तरी करतायत ना, समाधान माना.)

खरंतर आज पुस्तकं आणि त्यातूनही मराठी पुस्तकांसाठी करण्यासारखं खूप काही आहे. (आपण चर्चा करायचं सोडून बाकी काही करत नाही ते सोडा) सध्या सगळ्यात जास्त गंभीर प्रश्न लोकांना वाटतो तो हा की नवीन पिढी पुस्तकांपासून दूर जातेय, मराठी पुस्तकांना नवीन पिढी हात लावत नाही वगैरे वगैरे. मी स्वतः २२ वर्षांचा आहे. म्हणजेच नवीन पिढी चा प्रतिनिधी म्हणून मी यावर बोलायचं धाडस करू शकतो. मी स्वतः पुस्तकं वेडा आहे. हे खरंय की मी माझ्या पिढीत अल्पमतात आहे. पण तरीही मी असं ठाम पणे म्हणू शकतो की चांगल्या मराठी पुस्तकांना आजही मागणी तेवढीच असते. माझे कित्येक मित्र मैत्रिणी हे पुलंचे fan आहेत. व.पुं.ची पुस्तकं आणि कथाकथनाच्या CDs अजूनही खपतात. मी आणि माझी एक मैत्रीण प्रकाश नारायण संतांच्या लंपन वर तासंतास गप्पा मारू शकतो. अजून एक मित्र आहे ज्याला सावरकरांचे जवळ जवळ सर्व साहित्य पाठ आहे. मला तरी माझ्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात potential वाचक वर्ग दिसत असतो.

हो, खरंय की आमची पिढी आज जास्त करून इंग्लिश साहित्य वाचते, पण त्याला काही पर्याय ही नाहीए. सुंदर इंग्लिश साहित्य जर सहज रित्या उपलब्ध होणार असेल तर का लोकांनी त्यापासून दूर रहायचं? मराठीत खूप सुंदर साहित्य निर्माण झालंय. पण त्याचा वेग आज खूप मंदावलाय. मराठी पुस्तकांची भिस्त अजूनही जर श्री.ना. पेंडसे, गो.ना.दातार, पु.ल., व.पु., जी.ए., यांच्यावरच अवलंबून राहणार असेल तर खरंच कठीण आहे आमचं. यासाठी नाही की यांची पुस्तकं आज वाचनीय नाहीएत. तर यासाठी कारण गेली ४०-५० वर्ष बिचारी हीच मंडळी हा भार उचलत आहेत.

मला खरा प्रॉब्लेम यंग वाचकवर्ग मिळत नाहीए हा वाटत नसून यंग जनरेशन मराठी लेखनाकडे जास्त फिरकत नाहीए हा वाटतो.  एका १२-१३ वर्षांच्या मुलासमोर ५० वर्ष जुनं लॉर्ड ऑफ द रिंग्स, २० वर्ष जुनं फेमस फाईव, आणि अगदी आत्ता आत्ताचं हैरी पॉटर असे कितीतरी पर्याय उपलब्ध असतात. मराठीत काय दिसतं? आपण आजही बाळ साहित्य म्हणलं की भा.रा. भागवत आणि फास्टर फेणे इथे येऊन थांबतो. कितीही म्हणलं तरी आजचा १२-१३ वर्षांचा मुलगा/मुलगी गोट्या, चिंगी, वसंत, फास्टर फेणे यांच्याशी कित्येकदा स्वतःला relate नाही करू शकत. त्याला त्या व्यक्तिरेखा परक्या वाटतात. तेच कथा कादंबऱ्यांचं.

बरं परत नवीन पिढी ने लिहिण्याकडे वळावं असं म्हणाल तर त्यातही हजार लफडी आहेत. समजा मी एखादा लेख, एखादी कथा लिहिली तर ती लोकांपर्यंत कशी पोहोचवणार? आज मराठी मासिकांची झालेली परिस्थिती आपण सगळे बघतोच. शेवटी लिहिलेलं ते फेसबुक च्या नोट्स मधे, किंवा खूपच झालं तर ब्लॉग वर share करायचं आणि स्वस्थ बसायचं. आज गरज आहे जास्तीत जास्त लोकांना लिहायला प्रवृत्त करायची, आणि चांगल्या लेखनाला व्यासपीठ उपलब्ध करून द्यायची.

इंग्लिश पुस्तकं जेवढ्या सहजपणे इंटरनेट वर ई-बुक्स च्या माध्यमातून उपलब्ध आहेत त्या मानाने मराठी पुस्तकं कुठेच नाहीत, याचाही विचार व्हायला हवा. मी आज बरीच इंग्लिश पुस्तकं टॅब वर वाचतो, हीच सोय मला मराठी पुस्तकांसाठी मिळत नाही याची खंत वाटते.

खरंच खूप काही आहे करायला. कधी कधी मलाच उद्विग्नता येते. खरतरं वाचायला उत्सुक लोकं आहेत, पुस्तकंही आहेत. मग काय चुकतंय नेमकं? कळत नाही. जाऊदेत. आपल्याकडून होतंय तेवढं करावं आणि नाहीच जमलं काही तर किमान नव नवीन  पुस्तकांचा आनंद तरी घ्यावा. अगदी काही नाही तरी नवीन पुस्तकं विकत घेणे, मित्र- मैत्रिणींबरोबर पुस्तकांवर चर्चा करणे, आणि आवडलेले पुस्तक ओळखीच्यांना वाचायला देणे एवढं तरी आपण नक्कीच करू शकतो.

तर मुद्दा हा की खूप वाचूया, जमेल तसं लिहूया, आणि एखादं पुस्तकं आवडल्यास मराठी पुस्तक मित्र द्वारे ते लोकांपर्यंत देखील पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात 🙂

मराठी पुस्तक मित्र कडून जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 
 

टॅग्स: , , , , ,